Saturday, February 18, 2023

चॅट जीपीटी - तुमचा जादुई मित्र

 

चॅट जीपीटी - तुमचा जादुई मित्र 

सध्याचे तरुण व तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांच्या चर्चेचा विषय असणारी गोष्ट म्हणजे चॅट जीपीटी. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रत्येक मशीन सोबत इंटरनेट जोडले गेले व मशीन स्मार्ट होत गेली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले.  माणूस हा एक विचार करणारा बुद्धिमान प्राणी असून त्याच्या शरीरातील बुद्धी जसे काम करते तसेच काम एखाद्या मशीनला करायला सांगणे अथवा मशीन कडून करून घेणे  म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सध्या मार्केटमध्ये चर्चेत असलेले व दहा लाख लोकांपर्यंत अगदी पाच दिवसात पोहोचलेले हे एक प्रभावी शस्त्र म्हणजे चॅट जीपीटी. 

चॅट जीपीटी हे एक OpenAI या कंपनीने विकसित केलेले मॉडेल आहे. हे एक संवाद साधण्याचे, संभाषण करण्याचे मॉडेल आहे ज्यामध्ये ह्यूमन लैंग्वेज आणि नैसर्गिक भाषा समजून योग्य तो प्रतिसाद दिला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर याला तुम्ही विविध प्रश्न विचारू शकता ज्या प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटी अगदी एखाद्या माणसानेच दिली आहे अशा पद्धतीने वापरणाऱ्याला देतो. चॅट जीपीटी चा गुगल सर्च इंजिन सारखा वापर करता येतो मात्र चॅट जीपीटी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना अनुसरून प्रोसेसिंग करून उत्तर तयार करून देते. त्यामुळे तुम्हाला मिळालेले उत्तर मशीनने नाही तर एखाद्या प्रत्यक्ष माणसाने दिलेले आहे वाटते. इलॉन मस्क व सॅम ऑल्टमान यांनी नॉन प्रॉफिट कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था सुरु केली होती तिचेच नाव OpenAI  मात्र इलॉन यांनी लवकरच संस्था सोडली त्यानंतर ही प्रॉफिट साठी काम करते. OpenAI च्या वेबसाईट वर जाऊन  रजिस्ट्रेशन करून ही सुविधा सध्या मोफत उपलब्ध आहे.

 चॅट जीपीटी चा वापर व फायदे

१.  एखाद्या विषयावरील नवीन कल्पना तयार करण्यासाठी, नवीन विषय शोधण्यासाठी,  नवीन संकल्पना तयार करण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या कामाविषयी किंवा व्यवसायासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला  मशीनने  दिलेले उत्तर हे माणसांनी दिलेले आहे असेच वाटते.

 २. विद्यार्थी व ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना लेटर्स, नोटीस किंवा विविध विषयांवरील माहिती सह रिपोर्ट तयार करण्यासाठी तुम्हाला हव्या त्या विविध पद्धतीमध्ये डॉक्युमेंट तयार करून मिळू शकतात. अहो एवढेच काय तर तुम्ही विचारलेल्या एखाद्या विषयावर कविता सुद्धा चॅट जीपीटी तुम्हाला तयार करून देते.

 ३. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यासंबंधी क्रिएटिव्ह व विविध प्रकारची माहिती तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मिळवता येऊ शकते.

४.  तुम्ही कोड जनरेट करू शकता.

 ५. ज्या विद्यार्थ्यांना वाचन करुन शिकण्याची आवड असते त्यांना अभ्यासासाठी चॅट जीपीटीचा वापर करून अवघड संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजावून घेता येऊ शकतात.

 ६. चॅट जीपीटी  मशीन प्रोग्राम आहे. त्याला भावना समजत नाही परंतु काही विशिष्ट पद्धतीने तुम्ही त्याला भावनिक मुद्दे असलेले प्रश्न विचारले तर तो त्या प्रश्नांची विविध पद्धतीने व विविध परिस्थितीनुसार उत्तरे देऊन त्यापैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडावा असा सल्लाही देतो.

 काय करू शकत नाही

चॅट जीपीटी हे लैंग्वेज आधारित चॅट बॉक्स आहे. त्यामुळे जी माहिती त्याच्या मध्ये फीड आहे केवळ त्यावरच तो उत्तर देऊ शकतो. सध्या 2021 पर्यंत ची माहिती त्यामध्ये फीड  केलेली आहे असे सांगितले जाते. चॅट जीपीटी ला कॉमन सेन्स नाही, त्यामध्ये जे फीड केले आहे तेच तुम्हाला तुमच्या प्रश्नानुसार प्रोसेसिंग करून योग्य पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणी समजत नाही. विशेष भावना समजत नाही. तो खूप क्रिएटिव नाही कारण तो टेक्स्ट आधारित मॉडेल आहे. मात्र माणूस व मशीन यांच्यामधील अंतर कमी करण्याचे काम तो सध्या करतोय. भविष्यात आवाज व चित्र म्हणजे इमेजेस यांना समजून पण उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल असे वाटते.

नवीन तंत्रज्ञानाला  नकारात्मक बोलले जाणार नाही असे होणार नाहीजसे की चॅट जीपीटी मुळे लोकांची क्रिएटिव थिंकिंग कमी होईल, लोकांच्या नोकऱ्या जातील, त्याला विध्वंसक प्रश्न विचारून त्याचा वाईट उपयोग होईल, असे अनेक प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतात मात्र अशा पद्धतीची टीका प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीवर होतच असते.

खरंच चॅट जीपीटी गुगल ला पर्याय असेल का ? लोकांच्या नोकऱ्या खरंच जातील का ? माणूस व मशीन हा फरक पूर्णता नष्ट होईल का ? मशीन माणसापेक्षा जास्त स्मार्ट होईल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणच शोधायचा प्रयत्न करायलाच हवा मात्र माणसाने नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या फायद्यासाठी योग्य वापर करून घ्यावा हे महत्त्वाचे आहे. हे आर्टिकल  अभ्यास व विचार करून लिहीत बसण्यापेक्षा चॅट जीपीटी लाच  Write article on ChatGPT  असा प्रश्न मी विचारायला हवा होता असे सहज वाटून गेले . 

 

 माहिती संकलन व शब्दांकन

 सुरज पांगारकर

 #This article written for the  students to aware them about Industry 4.0 and skills required for the same.